नरबे फाटा येथे ट्रकची टेम्पोला धडक; तिघे जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे ट्रक चालवून समोरुन येणार्‍या टेम्पोला धडक देत अपघात केला. या अपघातात तीन जण जखमी झाले असून अपघाताची ही घटना मंगळवार 15 जुलै रोजी सकाळी 6.30 वा.सुमारास नर्भे फाटा येथे घडली.
या अपघातात फिरदोस न्यायत खले (40),अमजत आलेमिया जांभारकर (50) आणि मुज्जफिर अमजत जांभारकर (तिन्ही रा.पडवे,गुहागर) हे जखमी झाले. याबाबत फिरदोस न्यायत खले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार,15 जूलै रोजी खबर देणार आणि त्यांच्यासोबत असलेले दोघेजण हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो (एमएच-08-डब्ल्यू-4703) मधून पहाटे 4.30 वा.सुमारास जाकादेवी ते मिरकरवाडा जेटी असे जात होते. ते सकाळी 6.30 वा.सुमारास तरवळ घवाळीवाडी स्टॉपच्या अलीकडे नर्भे फाट्यच्यापुढे आले असता निवळी बाजुकडून येणारा ट्रक (एमएच-09-जीजे-4347) आणि या टेम्पोचा अपघात झाला.अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.