रामपूर येथे १२८ तर मार्गताम्हाणेत १२६ मि. मि. पावसाची नोंद
मार्गताम्हाणे सुतारवाडीत विद्युत तार तुटली
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील रामपूर, मार्गताम्हाणे परिसराला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपले. रामपूर, मार्गताम्हाणे परिसरात दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री संततधार चालू होती. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता पावसाची सततधार सुरूच होती. रामपूर येथे १२८ मि. मि. तर मार्गताम्हाणे येथे १२६ मि. मि. पावसाची नोंद झाली आहे.
दि. १५ जुलै रोजी रात्री १० वाजता मार्गताम्हाणे सुतारवाडी येथे विद्युत तार तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. मात्र तेवढा भाग बंद करून सर्वत्र विद्युत पुरवठा चालू ठेवल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले. रामपूर मार्गताम्हाणे परिसरात ७० टक्के भात लावणी झाली आहे. उर्वरित ३० टक्के भात लावणी राहिली. त्यांच्यासाठी पाऊस उपयुक्त पडला, बळीराजा भात लावणीच्या कामात गुंतला आहे. अन्य कोठेही नुकसान नाही.













