विकासात्मक व सुविधा संबंधित प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा- अब्दुलवहाब सुर्वे

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल अब्दुलवहाब सुर्वे आणि युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगगुरोह यांनी मागील दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामाबाबत त्वरित कार्यवाही करावी, असा इशारा महावितरणला देत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चिपळूण तालुका कार्यालय उपकार्यकारी अभियंता केरमकोंडा आणि अर्बन-१ चे अधिकारी कांबळी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, मागील दोन ते तीन वर्षापूर्वी आपल्या विभागाकडे विविध विकासात्मक व सुविधा संबंधित कामासाठी अर्ज निवेदन, सूचना व पाठपुरावा केला होता. यामध्ये काही ठिकाणी डी.पी. बसवणे, तुटलेल्या तारांची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर बदलणे, नवीन कनेक्शन मंजूर करणे, वीज पुरवठा सुरळीत करणे इत्यादी कामाचा समावेश आहे. मात्र, अत्यंत खेदाची बाब आहे की आजतगायत ही कामे पूर्ण झालेली नाहीत. ही कामे प्रलंबित राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून, स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सततच्या पाठपुरानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे विशेष दुःखदायक आहे. याबाबत महावितरण अधिकारी यांनी स्पष्टीकरण द्यावे की सदर कामे अद्याप का प्रलंबित आहेत? त्यासाठी जबाबदार कोण आहेत? हे काम कोणत्या कालावधीत पूर्ण केली जातील? यामध्ये अडथळा कोणत्या पातळीवर निर्माण झाला आहे? काम करण्यात आणखी विलंब झाल्यास जबाबदारी कुणाची राहील? असा प्रश्न श्री. सुर्वे यांनी केला असून महावितरण सारख्या मोठ्या शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारीच हलगर्जीपणा दाखवत असतील तर सर्वसामान्य जनतेचा शासकीय यंत्रणेवर विश्वास उडण्याची शक्यता आहे. म्हणून सदर प्रलंबित कामांची तात्काळ पूर्तता करावी. तसेच या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असेही या निवेदनात अब्दुलवहाब सुर्वे यांनी नमूद केले आहे.