वेंगुर्ले l प्रतिनिधी :शिक्षण हे केवळ वर्गखोलीत, चार भिंतींच्या आड मर्यादित राहता कामा नये, तर ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळालं पाहिजे या उद्देशाने जिल्हा परिषदेने सुरू केलेला विद्यार्थ्यांना शाळेबाहेर प्रत्यक्ष शेतात घेऊन जाणारा एक आगळा-वेगळा ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम उभादांडा नं.१ शाळा दरवर्षी राबवते.
“बांधावरची शाळा” या नावाने शेती शिक्षणावर आधारित प्रात्यक्षिक उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना गावातील प्रगतशील शेतकरी श्री. किशोर केरकर यांच्या शेतावर नेण्यात आले.
तिथे त्यांनी नांगरणी, तरवा काढणे, लावणी करणे, चिखल करणे, पाणी देणे, खते वापरणे, तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे व यंत्रसामग्री यांचा अनुभव घेतला.
मुख्याध्यापक श्री. गणेश चव्हाण शिक्षक, अनिशा झोरे, एकनाथ जानकर व युनुस पठाण यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवली. अवजारे हातात घेऊन मुलांना कृतीद्वारे समजावले. विद्यार्थ्यांनीही शेतीच्या कामात सहभाग घेत हातात नांगर, ट्रॅक्टर, कुदळ, फावडे घेऊन मातीची ओळख प्रत्यक्ष करून घेतली.
शेती म्हणजे केवळ धान्य उत्पादन नव्हे, तर कष्ट, संयम, नैसर्गिक बदलांशी लढा, आणि तांत्रिक ज्ञान यांचे गणित कसे असते, हे विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले.
या उपक्रमाबाबत पालक, ग्रामस्थ व स्थानिक शिक्षणप्रेमींनी विशेष कौतुक केले.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांचे व्यवहारज्ञान वाढते, तसेच त्यांना आपल्या मातीशी नातं जपता येते.”अशा भावना पालकवर्गातून व्यक्त झाल्या. शेतकरी श्री.किशोर केरकर व संदीप परूळेकर यांनी शेतीविषयी मार्गदर्शन करताना नविन पिढीने शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत व सेंद्रीय पद्धतीची शेती केली पाहीजे. स्वकष्टार्जित ‘पेज’ चविष्ट असते. यासाठी थोडी का होईना पण शेती प्रत्येक कुटुंबाने केली पाहिजे. असे आवाहन केले.
शेवटी मुख्याध्यापक श्री.गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना जि.प. सिंधुदुर्गने सुरू केलेला “बांधावरची शाळा” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात शेतीबद्दल आदर, मातीबद्दल आत्मीयता आणि शिक्षणाबद्दल नवीन दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला आहे. असे मत व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गजानन नरसुले, माजी अध्यक्ष श्री. संदिप परुळेकर व शेतकरी श्री.किशोर केरकर, रविंद्र केरकर तसेच पालकवर्गाचे आभार मानले.













