श्रीफळाची समृद्धी आणि धवलक्रांती कोकणाच्या अर्थकारणाला नवी दिशा

कोकण वार्तापत्र / संतोष वायंगणकर 

गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांत बाप्पाच्या आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत ज्याला अग्रस्थान असते, ते म्हणजे ‘श्रीफळ’ अर्थात नारळ. आजवर आमचा कोकणी शेतकरी केवळ ‘कच्चा नारळ विकणारा शेतकरी’ राहिला, पण आता त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणारा उद्योजक बनणे ही काळाची गरज आहे. शहरात दिवस-रात्र चाकरी करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून स्वतःच्या गावात मालक बनणे नक्कीच शक्य आहे..असे प्रयोग सिंधुदुर्ग ,रत्नागिरीतील शेतकरी करत आहेत. याला पालकमंत्री नितेश राणे यांचेही बळ मिळत आहे…

सध्या गावोगावी एक वेगळाच उत्साह, चैतन्य आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. वर्षातून एकदा येणारा आपला लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी घराघरात तयारी सुरु आहे. चाकरमानी, नोकरदार वर्ग आणि कामाच्या व्यापाने शहरात स्थिरावलेला कोकणी माणूस सर्व त्रास विसरून, गाड्यांची गर्दी सोसत आपल्या लाल मातीच्या ओढीने गावी लसे पोहोचायचे याचे मनसुबे आखत आहे. गणेशोत्सवाच्या या पवित्र दिवसांत बाप्पाच्या आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत ज्याला अग्रस्थान असते, ते म्हणजे ‘श्रीफळ’ अर्थात नारळ. आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या या नारळात आणि कोकणाच्या मातीत एक मोठी आर्थिक क्रांती दडलेली आहे, ज्यावर यंदाच्या या सण-उत्सवाच्या काळात विचार होणे गरजेचे आहे.गणेशोत्सवात घराघरात दाखल होणाऱ्या मंडळींनी नव्या वृक्ष लागवडीबाबत थेट कृती करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात नारळाची सर्वाधिक लागवड कोकणात, आणि त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते. इथली दमट हवा, मुबलक पाऊस आणि किनारी प्रदेशातील जमीन माडांच्या बागांसाठी अत्यंत पोषक आहे. येथील हापुस अन काजूचा जसा वेगळीच चव अन थाट आहे . अगदी याच पठडीत येथील श्रीफळ सुध्दा! मात्र, दुर्दैवाने ज्या प्रमाणात इथे नारळाचे उत्पादन होते, त्या तुलनेत ‘नारळ बोर्डा’च्या कामाची आणि नारळाच्या संगोपना बाबत काहीशी उपेक्षाच झालेली दिसते. काजू आणि आंब्याप्रमाणे नारळ व सुपारी लागवडीला अधिकाधिक प्रोत्साहन देणाऱ्या कोकणसाठी आता श्रीफळ क्रांतीची गरज आहे.
आजवर आमचा कोकणी शेतकरी केवळ “कच्चा नारळ विकणारा शेतकरी” राहिला. झावळ्यांपासून केरसुनी, काथ्यापासून उत्पादने घेण्याचे प्रयत्न फारच थोड्या प्रमाणात सुरु आहेत.मात्र काथ्या उद्योगाची चळवळ अजूनही कोकणात बळ घेत नाहीय..आता ही दिशा बदलण्याची वेळ आली आहे. कॉयर बोर्डाचे कामही कोकणात अधीक उर्जितावस्थेत येण्याची गरज आहे.शेतातून फक्त नारळ काढून बाजारात विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणारा उद्योजक बनणे काळाची गरज आहे….सध्या मध्यप्रदेश अणी केरळमधून मोठ्या प्रमाणात नारळ पुरविले जातात..
जशी हापूस आंब्याला ओळख आहे तशी सिंधुदुर्गातील नारळाला , कोकणच्या नारळाला स्वतःची स्वतंत्र ओळख का मिळू नये? “Konkan Coconut” किंवा “Sindhudurg Coconut” या नावाने स्थानिक ब्रँडिंग उभारले गेले, तर इथल्या नारळाला जगभरात मोठी मागणी मिळू शकते. पर्यटन, आरोग्यविषयक वाढती जागरूकता आणि नैसर्गिक उत्पादनांकडे लोकांचा वाढता कल पाहता नारळाचे अनेक उपपदार्थ तयार केले जाऊ शकतात.यासाठी तरुणांनी पुढे येऊन नारळ शेतीकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.कोकोपीट (Coir Pith), कॉयर उद्योग (दोरखंड), नारळ पाणी पॅकेजिंग, खोबरेल तेल, आणि नारळाच्या दुधापासून बनणारे विविध खाद्यपदार्थ……….
नारळ काढणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर आणि उच्च दर्जाच्या रोपांची निर्मिती.होमस्टे किंवा रिसॉर्ट्सच्या माध्यमातून पर्यटकांना थेट शेतातील ताजे नारळ पाणी व प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध करून देणे,शहाळ्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते बॉटल किंवा टेट्रा पॅकमध्ये शेल्फ-लाइफ वाढवून विकणे हा एक मोठा व्यवसाय आहे. पर्यटनाशी याची सांगड घातल्यास स्थानिक पातळीवर मोठी विक्री शक्य आहे.स्थानिक ब्रँड आणि जागतिक बाजारपेठ, ही साखळी विकसित झाली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक अभूतपूर्व उभारी मिळेल.काही शेतकरी शेतीत प्रयोग करत आहेत मात्र दुसऱ्यानेच प्रयोग करावेत असे म्हणण्यापेक्षा आपण प्रयत्न करुया असे व्हायला हवे. से प्रयोग सिंधुदुर्ग ,रत्नागिरीतील शेतकरी करत आहेत. याला पालकमंत्री नितेश राणे यांचेही बळ मिळत आहे.

नारळ बागांसोबतच कोकणाने आणखी एका क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, ती म्हणजे ‘धवलक्रांती’. एकेकाळी शेतीला केवळ पूरक किंवा जोडधंदा म्हणून पाहिला जाणारा दुग्ध व्यवसाय आज सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार बनत चालला आहे.
काही वर्षांपूर्वी राबवण्यात आलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे आणि त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ, जिल्हा परिषद आणि सिंधुदुर्ग प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज जिल्ह्यातील दूध संकलनाने तब्बल ६० हजार लिटरचा टप्पा पार केला आहे. ही केवळ आकडेवारी नसून कोकणातील शेतकरी जोडधंद्यातूनही स्वावलंबी होऊ शकतो, याचा हा जिवंत पुरावा आहे.
दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी येणारा चाकरमानी शहरात दिवस-रात्र कष्ट उपसत असतो. पण आज आपल्याच गावात, आपल्याच मातीत रोजगाराच्या आणि उद्योजकीय संधी निर्माण होत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), बँकांचे अर्थसहाय्य, कृषी विद्यापीठांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारच्या विविध योजना यांची सांगड घातली, तर शहरात चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या गावात मालक बनणे नक्कीच शक्य आहे.यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपण केवळ सुख-समृद्धीचे मागणे न मागता, आपल्या शेतीला आणि निसर्गसंपत्तीला उद्योजकतेची जोड देण्याचा संकल्प करूया. नारळाची मूल्यवर्धन साखळी आणि दुग्ध व्यवसायातील धवलक्रांती यांच्या संगमातून कोकणच्या भूमीत समृद्धीचा नवा सूर्य नक्कीच उगवेल!