भंडारी ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भंडारी हितवर्धक मंडळ राजापूरच्या वतीने गुणगौरव

राजापूर (वार्ताहर): दहावी, बारावी तसेच पदवी, पदवीत्तर व स्पर्धा परिक्षांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या तालुक्यातील भंडारी ज्ञातीतील गुणवंत ४३ विद्यार्थ्यांचा भंडारी हितवर्धक मंडळ राजापूरच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.
तालुक्यातील आडीवरे येथे मंडळाच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच हा गुणगौरव समारंभ पार पडला.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. यावेळी जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, समाज बांधव मनोज आडविरकर यांनी विद्यार्थी तथा समाज बांधव यांना उद्बोधक मार्गदर्शन केले. विशेषत: त्यांनी खेडोपाड्यात समाज बांधवांच्या पर्यंत पोहचून समाज एकत्रित व एकसंघ होण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेऊन आपले समाजाचे नांव उज्वल करणेसाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. मंडळाच्या अध्यक्षा सौ. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर कार्यक्रमाच्या नेटक्या नियोजनाबद्दल संयोजकाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला उद्योजक वसंत पाटील, सचिव राजू मयेकर, सदस्य प्रतिप भाटकर, जितेंद्र शिरवडकर, सौरभ जाधव, रविंद्र घोसाळे, महेश मयेकर, अमोल नार्वेकर, बाळकृष्ण हळदणकर, सौ. स्वाती बोटले, सौ. अक्षता पाटणकर, प्रसाद जाधव, सिध्देश पारकर, मिलींद आडविरकर, सुभाष नार्वेकर, राजेंद्र नार्वेकर, मोहन नार्वेकर, शिक्षक संजय जाधव, एकनाथ पाटील आदींसह मोठया संखेने समाज बांधव तथा विद्यार्थी /विद्यार्थीनी त्यांचे पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाचे जेष्ठ सदस्य अमर नार्वेकर, आडीवरे गावचे उपसरपंच सुनिलजी रुमडे यांनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रारंभी प्रास्ताविक उपाध्यक्ष नित्यानंद पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सुजित पारकर यांनी केले.