कुळेवाशी येथे गवारेड्याने शेतकऱ्यावर केला हल्ला; हल्ल्यात शेतकरी जखमी

देवरूख (प्रतिनिधी)* संगमेश्वर तालुक्यातील कुळेवाशी गावामध्ये गवारेड्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. गवारेड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला आहे. सिताराम सदाशिव गावडे (वय-५४) असे गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

 

शेतीचे नुकसान करणाऱ्या गवा रेड्याला सिताराम गावडे हे हाकवत असताना गवारेड्यानेच त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले. गेली अनेक दिवस गवा रेड्यांनी गावात धुमाकूळ घातला असून गवेरेडे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. याचसाठी शेतकरी देखील सध्या दिवसभर शेतामध्ये वावरून गवारेड्यांना पळवण्यासाठी सतर्क रहात आहेत. अशाच प्रकारे शेतीची राखण करत असताना शेतात घुसलेल्या गवा रेड्यांना सिताराम गावडे यांनी हाकवण्याचा प्रयत्न केला. ही दुपारची वेळ होती हाकवत असतानाच गवा रेड्याने सिताराम गावडे यांच्यावर हल्ला चढवला.

 

ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजताच त्यांनी मोठा गोंगाट केला. यामुळे गवारेडे पळून गेले. मात्र हल्ला केल्यामुळे गावडे यांच्या तोंडाला मोठा मार लागला. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांच्या ओठाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. गावडे यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र येथील शेतकरी सध्या भयभीत झाले असून ही बाब गावच्या सरपंच यांना सांगण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष गावडे यांची पाहणी करून वनविभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शेतात घुसणारे गवारेडे यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वनविभागाकडे ग्रामस्थांच्यावतीने त्यांनी केली आहे. गवारड्यांचा बंदोबस्त न झाल्यास शेतीच्या नुकसानी बरोबरच शेतकऱ्यांच्याही जीविताला धोका असल्यामुळे वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.