पर्यावरणपूरक शेतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
चिपळूण (प्रतिनिधी) : जलवायू बदल, नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय, आणि पारंपरिक शेतीतून मिळणारे घटते उत्पन्न या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या तरुण शेतकऱ्यांनी नवे पर्याय स्वीकारणे गरजेचे झाले आहे. या दिशेने एक आदर्श उदाहरण पेढांबे गावात घडले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येथील तरुण शेतकरी प्रथमेश शिंदे व विशाल शिंदे यांनी आपल्या १.०७ हेक्टर जमिनीवर टूल्डा जातीच्या १३०८ बांबू रोपांची लागवड करून पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमास उप कृषी अधिकारी संतोष भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. अश्विनी कणसे, ग्रामविकास अधिकारी सौ. पाटील, आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. बांबूला “हरित सोने” असेही म्हटले जाते. जलसंधारण, मातीची धूप रोखणे, हवामान शुद्ध करणे, आणि वनसंपत्तीचा पर्याय या बाबतीत बांबूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बांबू लागवड ही शेतीच्या उत्पन्नाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे. कमी खर्च, कमी पाणी, आणि चांगले दीर्घकालीन उत्पन्न देणारा हा पर्याय प्रत्येक शेतकऱ्याने स्वीकारावा. बांबू लागवडीतून फर्निचर, बांधकाम साहित्य, हस्तकला वस्तू, आणि जैविक वस्तूंना कच्चा माल मिळतो. भविष्यात यावर आधारित प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतात. कृषी विभागाच्या वतीने तरुण शेतकऱ्यांना बांबू, सागवान, फळबाग लागवड यासारख्या पर्यावरणपूरक, रोजगारनिर्मिती करणाऱ्या शेती प्रकारांकडे वळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेती ही फक्त अन्नधान्य उत्पादनापुरती मर्यादित न राहता, ती पर्यावरण, उद्यमशीलता आणि ग्रामविकासाशी जोडली गेली पाहिजे. तरुण पिढीने पुढाकार घेतल्यास कृषी क्षेत्रात मोठा बदल शक्य आहे, असे मनोज गांधी यांनी सांगितले. कृषी विभागाच्या वतीने सर्व तरुण शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर वनशेती, बांबू लागवड, सेंद्रिय शेती, औषधी वनस्पती उत्पादन यासारख्या नवनवीन क्षेत्रांकडे वळावे. ही शेती केवळ पर्यावरणपूरकच नाही, तर भविष्यातील आर्थिक स्थैर्य व ग्रामीण रोजगार निर्मितीसाठीही अत्यंत उपयुक्त ठरेल. पेढांबे गावात झालेली बांबू लागवड ही केवळ एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर तरुणांनी शेतीतील नवे मार्ग स्वीकारून ग्रामविकासाची जबाबदारी अंगीकारली पाहिजे, याचे ठोस उदाहरण आहे. ज्याप्रमाणे प्रथमेश शिंदे व विशाल शिंदे यांनी पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे कोकणातील सर्व तरुण शेतकऱ्यांनीही पर्यावरणपूरक शेतीसाठी सज्ज होणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन केले.












