भरत लब्धे यांचे आयोजन : स्मार्ट मिटरला कडाडून विरोध
चिपळूण (प्रतिनिधी) : वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील १३ गावातील विजेच्या संबंधित नागरिकांकडून येणाऱ्या विविध अडचणी, समस्या संदर्भात चर्चेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यासाठी वितरण कंपनीचे चिपळूण ग्रामीणचे अधिकारी पाटणकर सहकाऱ्यांसहित उपस्थित होते.
तसेच शिरगाव सरपंच सौ.नीता शिंदे, कुंभार्ली सरपंच रविंद्र सकपाळ, नागावे सरपंच सुरेश साळवी, माजी सरपंच प्रकाश पालांडे, पिंपळी बु.सरपंच स्मिता राजविर, कोळकेवाडीच्या माजी सरपंच आश्विनी साळवी, तळसर माजी सरपंच विजय साळुंखे, कोंडफणसवणे उपसरपंच संकेश पवार, शिरगाव सोसायटीचे माजी चेअरमन श्रीधर शिंदे, अलोरे तंटामुक्ती अध्यक्ष प्रितम आंब्रे, काँग्रेसचे ओबीसी तालुकाध्यक्ष केशव लांबे,लक्ष्मण जाधव, रफिक देवळेकर, निलेश शिंदे, हरिश्चंद्र फुटक, चंद्रकांत भंडारे व १३ गावातील अनेक ग्रामस्थ, तक्रारदार उपस्थित होते. नविन कनेक्शन, लाईनवरील झाडे तोडणे, धोकादायक पोल बदलणे, वारंवार वीज जाणे, चौकशी केली असता योग्य खुलासा न होणे, कॉन्ट्रॅक्टरने कामे वेळेत न करणे, कामासाठीच्या निधीसाठी जिल्हा नियोजनकडे बोट दाखविणे, ग्रामपंचायत स्तरांवरील पाणी योजनेच्या विजेच्या समस्या आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट मिटरबद्दल सर्वानी तीव्र भावना व्यक्त करीत स्मार्ट मीटर बसविण्यास कडाडून विरोध केला. विजेची लाईन शिफ्टिंग किंवा इतर कामासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविला जातो तो मंजुरीला खूप विलंब होतो तोपर्यंत ते काम होत नाही या काळात दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? ही कामे कंपनी आपल्या नफ्यातून का करीत नाही?असा प्रश्न भरत लब्धे यांनी उपस्थित केला. भाई शिंदे, प्रितम आंब्रे, निलेश शिंदे, रफिक देवळेकर, संकेश पवार, लक्ष्मण जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला. वीज कंपनीचे चिपळूण ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता पाटणकर तसेच सहाय्यक अभियंता तेजश्री उगारे यांनी कामात सुधारणा करण्यात येईल, तशा सूचना यानंतर होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत केल्या जातील असे सांगितले. मोठ्या दुरुस्तीसाठी वीज फारकाळ जाणार असेल तर याची सुचना ग्रामस्थ व व्यापारी यांना दिली गेली पाहिजे. त्यासाठी व्हाट्सअप ग्रुपचा वापर करावा. आता अनेकजण घरामध्ये ऑनलाईन कामे करीत असतात त्यांचे नुकसान होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे, अशा सूचना भरत लब्धे, भाई शिंदे, प्रितम आंब्रे यांनी केल्या.












