लांजा तालुका भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती-संतोष कोत्रे
लांजा-: राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ठोस आश्वासनामुळे लांजा नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याला शंभर टक्के स्थगिती मिळेल आणि हा प्रश्न मार्गी लागेल, असा ठाम विश्वास लांजा तालुका भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले व अन्य पदाधिकाऱ्यांनी लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्या (डिपी) संदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्वच दृष्टीने त्रासदायक ठरणारा विकास आराखडा लोकांना नको असल्याने ग्रामस्थांच्या या भूमिकेला भाजपा पक्षाचे संपूर्ण समर्थन आहे. आम्ही सर्व भाजपा पदाधिकारी लांजा कुवे येथील लोकांच्या समवेत असून या विकास आराखड्याला स्थगिती मिळावी म्हणून आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पक्ष स्तरावर पाठपुरावा करत आहोत.
लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्या (डीपी) मुळे लोकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. आणि या आराखड्याला स्थगिती मिळावी अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी आपण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मांडली आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेले मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याशी देखील आपण चर्चा केली होती. हा प्रारूप विकास आराखडा रद्द होण्याच्या दृष्टीने जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते आपण त्यांच्यासमोर मांडले होते.यासाठी आपण तज्ञ व्यक्तींची देखील मदत घेतली होती. आणि हे सर्व मुद्दे आपण मंत्री नितेश राणे यांच्या कानावर घातले आहेत. त्यांनी देखील लोकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः आपण चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे.
त्यामुळे लवकरच प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळेल अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. असे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला भाजपा दक्षिण मंडळाचे अध्यक्ष शैलेश खामकर, उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले, जिल्हा निमंत्रण सदस्य विजय कुरुप ,माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कुरूप, माजी जिल्हा सरचिटणीस प्रभाकर टोळे, इकबाल गिरकर, माजी नगरसेवक मंगेश लांजेकर तसेच अनिल कांबळे व अन्य भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.












