रत्नागिरी सार्वजनिक गणेशोत्सवाचा स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी :
खासदार नारायणराव राणे यांच्या प्रेरणेतून रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाने रत्नागिरीतील मिऱ्या येथील दोन गरजूंना अलिम्को संस्थेच्या सहकार्याने डिजिटल श्रावण यंत्र दिले आहे.
या उपक्रमासाठी गणेशोत्सव मंडळाचे ययाती शिवलकर यांचे विशेष सहकार्य होते. रत्नागिरी गणेशोत्सव मंडळ गेली वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. गोरगरीबांना अडीअडचणी नेहमीच सहकार्याची भूमिका गणेशोत्सव मंडळ घेत असते. यामागे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांची प्रेरणा असते. काही दिवसांपूर्वी मंडळाचे कार्यकर्ते ययाती शिवलकर यांनी खा. नारायण राणे यांना मिऱ्या येथील रहिवाशी रमेश पांडुरंग शिरधनकर आणि विनायक काशिनाथ मोरे यांना श्रवणयंत्राची गरज असून ते उपलब्ध करावे अशी विनंती केली. यावेळी खा. नारायण राणे यांनी आश्वासन देत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) संस्थेकडून अत्याधुनिक श्रवणयंत्र मिळवून दिले. यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंडळाचे सदस्य ययाती शिवलकर, निखिल शेट्ये, योगेश मगदूम, अमृत गोरे आदी सदस्यांनी दोन्ही लाभार्थ्यांना श्रवणयंत्र सुपूर्त केले. मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करतानाच खासदार नारायणराव राणे यांना शुभेच्छा दिल्या.











