लांजा बस स्थानकातून वेरवली खुर्द पडवण-लांजा एसटीचा शुभारंभ

वेरवली खुर्द- पडवण गावातील पाच किलोमीटर अंतर पायी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार फायदा

लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेरवली येथील श्रीराम विद्यालय वेरवली च्या विद्यार्थ्यांसाठी लांजा एस टी आगारामार्फत सकाळी १०.०० वाजता पडवण लांजा ही एसटी बस फेरी सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ नुकताच झाला.
वेरवली खुर्द- पडवण गावातील सुमारे पाच किलोमीटर अंतर पायी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या बस फेरीचा उपयोग होणार आहे. गावात सदर बस फेरी दाखल झाल्यानंतर एसटी बस चे स्वागत श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पंढरी गुरव यांच्या हस्ते गाडीला हार घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थी ग्रामस्थ व पालक वर्ग यांना पेढे वाटण्यात आले. यावेळी शाळेकडून चालक मंगेश वालकर व वाहक जितेंद्र माजलकर या दोघांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक प्रदीप लाड यांनी ह्या बस फेरी साठी प्रयत्न करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल रेडीज, संस्थेचे संचालक रवींद्र डोळस, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पंढरी गुरव, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गुरव, सुरज कुडतडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनेश पवार या मान्यवरांचे आभार मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.