रत्नागिरी, दि. 31 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी प्राथमिक स्तर (इयत्ता पाचवी) आणि उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता आठवी) परीक्षेसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी (रात्री 11.59 वाजेपर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे.* नावनोंदणी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरावा. अर्ज भरण्याबाबतच्या आवश्यक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्र. सचिव, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे प्रमोद गोफणे यांनी केले आहे.
मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार 01 ऑगस्ट ते गुरुवार 14 ऑगस्ट 2025 (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे. या कालावधीत विद्यार्थी स्वतः ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरू शकतील. मूळ अर्ज आणि कागदपत्रे संपर्क केंद्रात जमा करण्याची मुदत 19 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट असून ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मूळ अर्ज, विहित शुल्क आणि मूळ कागदपत्रांसह नमूद केलेल्या संपर्क केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. विभागीय मंडळाकडे स्तरावर अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत 04 सप्टेंबर 2025 आहे. संपर्क केंद्रांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.