हातखंबा येथे वीज खांबावरती वायरमन भाजून जखमी

रत्नागिरी :
वीज खांबावर काम करीत असलेला वायरमन रिव्हर्स करंट आल्यामुळे भाजल्याची घटना तालुक्यातील हातखंबा येथे घडली. सहकारी कर्मचारी व ग्रामस्थांनी तात्काळ या कर्मचार्‍याला खांबावरुन खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले.
हातखंबा हायस्कूलनजीक वीज खांबावरती काम सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी वीज वाहिनीवरील विद्युतप्रवाह बंद करण्यात आलेला हातेा. त्यानंतर हा कर्मचारी वीज खांबावरती दुरुस्तीचे काम करीत होता. अचानक रिव्हर्स करंट आल्याने तो चिकटला. त्याचवेळी सोबतीला असणार्‍या कर्मचार्‍याने खांबावरती पुन्हा शटडाऊन करीत वीज प्रवाह बंद असल्याची खात्री केली. त्यानंतर महावितरण कर्मचार्‍यासह ग्रामस्थांनी शिड्या आणून या वायरमनला खाली उतरवले. त्याच्या दोन्ही पायांना व हाताला जखमा झाल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून या कर्मचार्‍याचा जीव वाचला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हातखंबा येथील सामाजिक कार्यकर्ते निरंजन जठार व त्यांच्या सहकार्‍यांनी वेळीच धावपळ करण्यात पुढाकार घेतला.