ग्रा. पं. सदस्य साई काणेकर यांची जलसंपदा विभागाकडे मागणी
बांदा l प्रतिनिधी : बांदा – डिंगणे बांबरवाडी रस्त्यावर कालव्यावर असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता आहे. याठिकाणी तात्काळ संरक्षक गार्ड बसवावेत व रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या पुलावरून काही दिवसांपूर्वी ७ वर्षीय मुलगा कालव्याच्या पाण्यात पडून अपघात घडला होता. तसाच अपघात भविष्यात सुध्दा याठिकाणी घडू शकतो. सदर रस्ता हा बारमाही रहदारीचा आहे. त्या पुलाजवळ वळण असल्याने वाहन देखील आतमध्ये पडून अपघात होऊ शकतो.
तसेच कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर १०० मिटर पर्यंत नागरीवस्ती असल्याने त्या ठिकाणी संरक्षक गार्डची अत्यंत गरज आहे. तसेच या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण देखील तत्काळ करून मिळावे.
तरी संबंधित जागेची पाहणी करून त्वरीत गार्ड रेलिंग बसविण्याची व्यवस्था करावी. जर भविष्यात याठिकाणी अपघात घडून नुकसान झाल्यास आपणास जबाबदार धरले जाईल. यावेळी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.













