मुंबई-गोवा महामार्गावर माकड आडवे आल्याने दुचाकी घसरली; महाडमधील दोघे जखमी

खेड (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट येथे दुचाकीसमोर अचानक माकड आल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना १७ जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
लोठे एमआयडीसी येथून महाडच्या दिशेने जाणारी एमएच-०६ बीजे-८३४७ क्रमांकाची दुचाकी भोस्ते घाट परिसरातून जात असताना अचानक माकड समोर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला.
या अपघातात महाड येथील नागरवाडी परिसरातील इरफान अब्दुल लतीफ खान (वय ४२) आणि धर्मेंद्र फंकेश सरसिंग (वय ५४) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांच्या २४ तास विनामूल्य रुग्णवाहिका सेवेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमींना त्वरित धन्वंतरी हॉस्पिटल, भरणे येथे उपचारासाठी दाखल केले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून जखमींवर उपचार सुरू आहेत. घाट परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.