विजयदुर्ग ग्रामस्थ आणि इतिहासप्रेमी नाराज
नाराजी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत
विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला नुकताच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने लाकडी दरवाजा बसविला. साधारण एक-एक टनाचे हे दोन दरवाजे आता मात्र वादामध्ये सापडले असून या लाकडाचा दर्जा आणि बांधणी निकृष्ट दर्जाची असल्याने विजयदुर्ग ग्रामस्थ तसेच इतिहासप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात विजयदुर्ग ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले असून प्रत्यक्ष पाहणी करण्याची त्यांना विनंती करण्यात आली आहे. या पत्रात कोवळे आणि निकृष्ट दर्जाचे लाकूड वापरल्याने तसेच त्याची बांधणीही पूर्वीच्या दरवाज्याप्रमाणे नसल्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमावलीस अनुसरून या दरवाजाचे काम झाल्याचे दिसत नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब अतिशय संवेदनशील आणि लोकभावनेची असल्याने पुरातत्त्व विभागाला कळविण्यात यावी असं प्रभारी सरपंच रियाज काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहाय्यक राजेश दिवेकर यांच्याशीही संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सदर दरवाजाला तत्कालिन कामाचा बाज नसून बरीच वर्षे काम चालू असतानाही दरवाज्याचे काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले.
चौकट
पूर्वीचा दरवाजा सोळाव्या शतकात किल्ल्याचे काम करतेवेळी बांधण्यात आला. समुद्रालगतच्या हवामानातही सागवानी लाकूड टिकत असल्याने त्यावेळी परिपक्व सागवानी लाकडाचा वापर दरवाजासाठी करण्यात आला होता. दरवाजाला मोठे लोखंडी खिळे दरवाज्याची भव्यता स्पष्ट करत होते. मात्र सध्याच्या दरवाजाला लावलेले खिळे शोभत नाहीत असं मत इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे. शिवकालीन संरक्षण वास्तुशास्त्राचे उत्तम उदाहरण असलेला पूर्वीचा दरवाजा आणि त्याचे छायाचित्र उपलब्ध असतानाही त्याला अनुसरून नवीन दरवाजाचे काम का झाले नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.












