तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात बार व्यवसायिक आक्रमक

कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण छेडण्याचा ईशारा

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

राजापूर l प्रतिनिधी :  जिल्हयातील अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात कडक कारवाई करा असे आदेश पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिलेले असतानाही राजापूर तालुक्यात मोठया प्रमाणावर राजरोसपणे अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री सुरू आहे. या विरोधात राजापूर तालुक्यातील हॉटेल व बार व्यावसायिकांना तीव्र नाराजी व्यक्त करत येत्या १३ ऑगस्ट पर्यंत या अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली नाही व तालुक्यातुन याचे समुळ उच्चाटन केले नाही तर १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्याचा ईशारा दिला आहे. याबाबतचे एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

अशा प्रकारे राजरोसपणे सुरू असलेल्या गोवा दारू विक्रीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे या विरोधात कठोर कारवाईची मागणी या हॉटेल व बार व्यावसायिकांनी केली आहे.

१३ जुलै २०२५ रोजी राज्याचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत व राज्य उत्पादन शुल्काचे संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी यांची रत्नागिरी जिल्ह्यातील बारमालकांसोबत बैठक झाली. या बैठकीत आमच्या सगळ्या शंकांचा निरसन केले. यावेळी गोवा बनावटीची दारू आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असून त्याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री ना. सामंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या विरोधात तात्काळ कठोर कारवईचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत राजापुरात या विरोधात कारवाई झालेली नाही. राजापूर तालुक्यात शहर व ग्रामीण भागात गावोगावी गोवा बनावटीची स्वस्त दारू मोठ्या प्रमाणात राजरोसपणे विकली जात आहे. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

शासनाने मद्याच्या दरातही वाढ केली आहे. त्याचाही फटका आंम्हा व्यावसायिकांना बसत आहे. अशा प्रकारे स्वस्त मिळणारी गोवा दारू लोक खरेदी करत आहेत. याचा परिणाम अधिकृत परवाना घेऊन व शासनाकडे कर भरून व्यवसाय करणाऱ्या आंम्हा व्यावसायिकांवर होत आहेच पण यातुन शासनाचाही लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे.

त्यामुळे १३ ऑगस्ट पूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राजापूर तालुक्यात गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या अनाधिकृत व्यवसायिकांविरोधात कारवाई करून हे व्यवसाय कायमस्वपी बंद केले नाहीत, तर आंम्ही सर्व बार मालक हॉटेल व्यवसायिक १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करू असा ईशारा राजापुरातील बार मालक व हॉटेल व्यावसायिक यांनी दिला आहे.

या निवेदनावर जयेंद्र कोठारकर, विनय गुरव, प्रशांत शिंदे, श्री काणेकर, संदेश पाथरे, प्रशांत पवार, सचिन आखाडे, अनिकेत अशोक सक्रे आदींसह परवाना धारक २० व्यावसायिकांच्या सह्या आहेत.