कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरुद्ध चंदगड ते कोल्हापूर शिक्षण हक्क यात्रा संपन्न…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर:महाराष्ट्रात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून विरोध वाढताना दिसतोय. या निर्णयामुळे वाड्या, वस्त्या, तांडे आणि दुर्गम भागातील दलित, आदिवासी आणि बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करण्यात येतोय. या निर्णयाविरोधात “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” अभियानांतर्गत चंदगड ते कोल्हापूर अशी शिक्षण हक्क यात्रा सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या वीस पटाखालील शाळा बंदच्या निर्णयाच्या विरोधात ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ या अभियानांतर्गत,विविध सामाजिक संघटना, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आज चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रेला सुरुवात झाली. आजरा, भुदरगड राधानगरी मार्गे कोल्हापूर येथे यात्रेचा समारोप झाला. येथील कैलास चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिक्षण हक्क यात्रेला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून नवीन वसाहत मार्गे कार्यकर्ते तहसील कार्याजवळ जमले. यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले वीस पटाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यायला हवा. ‘गाव तांडा वस्ती-वाडी येथे शाळा’ हेच धोरण कायम ठेवायला हवे.एक विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू राहणे हा त्या विद्यार्थ्यांचा हक्क आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं ही राज्याची गरज आहे.मात्र कमी पट संख्येचे कारण देत शाळा बंद करणं हा अधिकाराचा भंग असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी ‘शिक्षणं आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच’, ‘गोरगरीब लेकरांना शिक्षण मिळालेच पाहिजे’, नितीन पाटील म्हणाले दरवर्षी अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च कमी केला जात आहे बहुजन समाजाने शिक्षणापासून वंचित राहिले पाहिजे असे या मागचा हेतू आहे याला सर्व स्तरातून प्रकर विरोध व्हायला हवा.यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा,रिक्त शिक्षक पदे ताबडतोब भरावीत अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.