खेड (प्रतिनिधी)
रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे मंगळवार, 29 जुलै 2025 रोजी ‘जागतिक व्याघ्र दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाघाच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी कु. पार्थ पाटील याने भाषण करताना वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. “वाघांची संख्या झपाट्याने घटत आहे, त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे,” असे त्याने नमूद केले.
शाळेतील शिक्षक सौ. मानसी देवघरकर, श्री. ओंकार काष्टे, सौ. छाया भोजने व सौ. मयुरी कारेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वाघांचे संवर्धन हे पर्यावरणाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नामशेष होणाऱ्या प्रजाती वाचवण्यासाठी लोकजागृती हा प्रभावी मार्ग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘इको क्लब फॉर मिशन लाइफ’ या उपक्रमांतर्गत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कला शिक्षिका सौ. मानसी देवघरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कल्पक चित्रांच्या माध्यमातून वाघसंवर्धनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख श्री. राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख श्री. शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख सौ. तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके, सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मिनाक्षी निवाते यांनी केले.
संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल व पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जागतिक व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.













