खेड (प्रतिनिधी)
रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे दिनांक 28 जुलै 2025 रोजी ‘निसर्ग संवर्धन दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम आणि जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नेचर वॉक’ चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या आसपासच्या हिरवळीत घेण्यात आलेल्या या निसर्गभ्रमंतीमध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गाचे सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवले. निसर्गाशी नाते दृढ करण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.
यावेळी ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
नेचर वॉकदरम्यान शाळेतील शिक्षक श्री. शुभम मुद्राळे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. “बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे, म्हणून झाडे लावणे आणि त्यांचे जतन करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी विविध वनस्पती, प्राण्यांचे जीवन, शुद्ध हवा व पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन व सहकारी यांच्यासह निसर्ग संवर्धनाची शपथ घेतली आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जबाबदारीची भावना आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण झाली, अशी माहिती शाळेच्या प्रशासनाकडून देण्यात आली.












