चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील पालवण ग्रामपंचायतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जल जीवन मिशन आणि मिशन बंधारा २०२६ हे दोन महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमामुळे पालवण गाव वाडीतील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. या उपक्रमासाठी पालवण ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि पाणी कमिटीने एकत्र येत नियोजन केले आहे. यामध्ये पाणी कमिटी अध्यक्ष श्री. भरत मारुती सावर्डेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. तर ग्रामविकास अधिकारी श्री. स्वप्निल घाडगे यांनी शासकीय योजनांचा पाठपुरावा करून हा प्रकल्प मार्गी लावला आहे.
ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद भुवड, माजी उपसरपंच गणेश विचारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष समीर सुर्वे, सदस्य विजय सावर्डेकर, प्रसाद कारेकर, ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर सुर्वे आणि विशेष सहकार्य म्हणून श्री. प्रशांत डिके यांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुढील उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर पालवण ग्रामपंचायतीने ओढे, नाले यावर छोटे-छोटे बंधारे बांधून पाणी अडवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे भूजल पातळी वाढणार असून, विहिरींना पाणी राहणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पालवण गावातील वाडीतील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामामुळे पालवण ग्रामपंचायत ही संपूर्ण चिपळूण तालुक्यात पाणीदार ग्रामपंचायत म्हणून नावारूपास येत असून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.













