दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत रस्त्यावर बेवारस गुरे फिरत असल्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस ही जनावरे मुख्य रस्त्यावर थांबत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते.
दोडामार्ग शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, तसेच प्रमुख रस्त्यांवर ही जनावरे मुक्तपणे फिरत आहेत. बऱ्याच वेळा ही गुरे रस्त्याच्या मध्येच बसून राहतात किंवा अचानक वाहनांसमोर धाव घेतात. त्यामुळे दुचाकीस्वार व वाहनचालकांसाठी धोका निर्माण होतो.
नगरपंचायतीने वारंवार सूचना देऊनही जनावरांचे मालक दुर्लक्ष करत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ही गुरे बेधडक शहरात संचार करत आहेत.
नगरपंचायत प्रशासनाने बेवारस गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा. जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि शहरात पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.












