निगुडे माऊली पुनः प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा आजपासून

दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

बांदा : प्रतिनिधी

निगुडे ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवस्थान पुनःप्रतिष्ठाना पहिला वर्धापन दिन सोहळा २७ व २८ जानेवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मंगळवार २७ रोजी ८ वाजता मंगला चरण, प्रायच्छित विधी, यजमानांचे शरीरशुद्धीसाठी पंचगव्य प्राशने, सर्व देवतांना आवाहन, प्रार्थना, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्य वर्णन प्राकारस्थल शुद्धी, मुख्यदेवता स्थापना, सप्तशक्ती पाठवाचन, सुहासिनींसाठी कुंकूमार्जन परिवार देवतांवर अभिषेक पूजन हे कार्यक्रम होतील. सकाळी ११ वा. सुवासिनींसाठी कुंकूमार्जन, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ९ वा. राजू जोशी यांचे प्रवचन होईल.

 

बुधवार २८ रोजी सकाळी ९ वा. रोणापाल, इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली गावच्या शिमघडे मानकरी व ग्रामस्थ यांचे आगमन व स्वागत होईल. ९.३० वा. मंगलाचरण, अग्निस्थापना, सग्रहमख, सप्तशती हवन, सत्यनारायण महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आचार्यादी ब्राह्मण पूजन, कुमारीका पूजन, कुष्मांडबलिदान, देवतांना प्रार्थना, आरती व तीर्थप्रसाद आणि दुपारी महाप्रसाद होईल.

 

दुपारी ३ वाजता माऊली देवीचे दर्शन व ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम तसेच रात्री ८ वा. शिव गणेश कला व सांस्कृतिक मंडळ हळर्ण गोवा प्रस्तुत ‘नवामीच्या मध्यरात्री’ हे ऐतिहासिक नाटक होईल. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख मानकरी, नवरात्र उत्सव समिती, महिला कमिटी व समस्त निगुडे ग्रामस्थांनी केले आहे.