मंडणगड : प्रतिनिधी, –तालुक्यातील शेनाळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी बनवण्याच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सहभाग नोंदवून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांची निर्मिती देखील केली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, स्वावलंबनाची भावना तयार व्हावी याकरिता प्रशालेत विविध उपक्रम राबविले जातात, त्यातील राखी बनवण्याची कार्यशाळा हि त्याच उपक्रमांचा एक भाग. कार्यशाळेत रंगीबेरंगी, तिरंगी विविध आकाराच्या राख्या बनवण्यात मुले मग्न झाली, स्वतः बनवलेल्या राख्या पाहून विलक्षण आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता. प्रशालेच्या शिक्षिका सौ. शेले मॅडम या कामात विद्यार्थ्यांना मदत करत होत्या. तर याच राख्यांनी आपल्या भावाला रक्षाबंधन करणार असल्याचा शाळेतील मुलींचा हट्ट सोबत होता तो वेगळाच. टाकाऊ तून टिकाऊ ही संकल्पना राबवत विद्यार्थ्यांनी राख्या बनविताना टाकाऊ वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला हे विशेष. विद्यार्थ्यांची राखी बनवण्याची हि अनोखी कार्यशाळा पाहून मुख्याध्यापक सुनील ऐनकर यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. शिक्षक सतीश खैरे, गणेश गुळेकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.












