दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग शहरात मोकाट गुरांची समस्या मोठी डोकेदुखी झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रवीकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली कसई-दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची भेट घेऊन शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येकडे लक्ष वेधले.
दोडामार्ग शहरातील चारही मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठाण मांडून असतात. त्यामुळे अनेक वेळा अपघातही घडले आहेत. सध्या गणेशोत्सव जवळ आला असून शहरात खरेदीची नागरिकांची गर्दी वाढत आहे. मोकाट जनावरांमुळे दिवसा – रात्री अपघात घडत आहेत.
यासाठी रवीकिरण गवस यांनी आक्रमक भूमिका घेत नगरपंचायत प्रशासनाकडे मोकाट गुरांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी केली. संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करावी याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. तसे लेखी निवेदन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी दोडामार्ग शहरात घंटागाडीवरुन संबंधित मालकांना मोकाट जनावरावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरात गोशाळा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी संकेत गायकवाड व नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, युवा अध्यक्ष गौतम महाले, उल्हास नाईक आदी उपस्थित होते.












