दोडामार्ग l प्रतिनिधी :कचरा गाडीत टाकलेल्या कचऱ्यामध्ये हरवलेले मंगळसूत्र दोडामार्ग नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेला परत मिळाले आहे. या घटनेमुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
आज सकाळी ११.१५ वाजता नगरपंचायतीची कचरा गाडी नेहमीप्रमाणे कचरा संकलनासाठी सावंतवाडा प्रभागात गेली होती. यावेळी सौ. सोनाली आपा देसाई यांनी त्यांच्या घरातील कचरा गाडीत टाकला. कचरा टाकल्यानंतर काही वेळाने त्यांना आपले मंगळसूत्र हरवल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते मंगळसूत्र सापडले नाही. कचऱ्याच्या डब्यातच ते पडले असावे, असा विचार करून त्यांनी सावंतवाडा येथील रहिवासी व दशावतारी नाट्य कलाकार उली नाईक यांना ही बाब सांगितली.
उली नाईक यांनी तातडीने कचरा गाडीजवळ जाऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी प्रताप राऊळ व सुनील आरोसकर यांनी कचरा टाकलेल्या ठिकाणी जाऊन कचऱ्यामध्ये शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर त्यांना सौ. सोनाली देसाई यांच्या कचऱ्यामध्ये मंगळसूत्र सापडले.
नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी ते मंगळसूत्र पती आपा वसंत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले. या मंगळसूत्राची बाजारभावाप्रमाणे किंमत दीड लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळसूत्र परत मिळाल्याने सौ. सोनाली देसाई यांनी नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे शहरात त्यांचे कौतुक होत आहे.












