गणपतीपुळे : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी आणि पवित्र श्रावण महिना यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने गणपतीपुळ्याच्या स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पूजा आणि धार्मिक कार्यक्रम
आज पहाटे साडेतीन वाजता मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा, आरती आणि मंत्रपुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता खुले करण्यात आले. भाविकांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात महाभिषेक, सहस्रार्चन, गणपती स्तोत्राचे पठण आणि भजने यांचा समावेश आहे. मंदिराच्या परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने अनेक भाविकांनी दिवसभर उपवास केला आहे. गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा आणि मंदिराच्या परिसरात भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळत आहे. रत्नागिरीसह आसपासच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक या विशेष दिवशी गणपतीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिराच्या व्यवस्थापनाने योग्य ती व्यवस्था केली आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री चंद्रोदयाची वेळ झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन भाविक आपला उपवास सोडतील. या विशेष योगामुळे गणपतीपुळे येथे सध्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण दिसून येत आहे.










