
सावंतवाडी । प्रतिनिधी : समाजाचे रक्षणकर्ते पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सावंतवाडी शाखेने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक स्तुत्य उपक्रम राबवला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना आणि उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या योगदानाला मानवंदना दिली.
दरवर्षी बहिण-भावाच्या नात्याचा सण म्हणून साजरा होणारा रक्षाबंधन, यावर्षी अभाविपने सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देत साजरा केला. देशाची आणि समाजाची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांप्रति आदर व्यक्त करत आणि जनतेच्या आरोग्याची रात्रंदिवस काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राख्या बांधल्या.
या उपक्रमांतर्गत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रथम सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनगटावरही राखी बांधली. देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या या दोन्ही समाजघटकांप्रती त्यांनी आभार व्यक्त केले. अभाविपच्या या उपक्रमाने पोलीस आणि आरोग्य कर्मचारी भारावून गेले. त्यांनी समाजाच्या संरक्षणासाठी आणि स्वास्थ्यासाठी नेहमी तत्पर राहण्याचे वचन दिले.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सावंतवाडी शहर प्रमुख ज्ञानेश्वर गवळी, जिज्ञासा संयोजक स्नेहा धोटे, तेजल कित्तुरे, उत्तरा पेडणेकर, प्रतिक्षा चन्ने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.











