भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन : रत्नागिरीत पोलीस परेड क्रीडांगणावर मुख्य शासकीय ध्वजारोहण

रत्नागिरी, दि. 12 ऑगस्ट –
भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यासाठी रत्नागिरीतील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता पोलीस परेड क्रीडांगणावर होणार आहे. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होईल.

राज्यभर एकाचवेळी होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभामुळे, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत कोणताही इतर शासकीय किंवा निमशासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दिले आहेत. संस्थांना आपला स्वतंत्र ध्वजारोहण कार्यक्रम घ्यायचा असल्यास तो सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भातील बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, पोलीस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके आदी उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागाचे आवाहन
स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिक, संस्था व शासकीय कार्यालयांनी तिरंगा फडकवावा आणि त्याची छायाचित्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावीत, असेही निर्देश देण्यात आले.

तसेच, मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.