‘
सावंतवाडी: शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अद्विता दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर तिने केलेल्या प्रभावी मांडणीमुळे तिने परीक्षकांची मने जिंकली आणि जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरली.
अद्विताने आपल्या वक्तृत्वाद्वारे क्वांटम युगाची संकल्पना, या क्षेत्रातील नवनवीन शक्यता आणि भविष्यातील आव्हाने यांवर सखोल विचार मांडले. तिच्या भाषणाची शैली आणि विषयावरील पकड यामुळे ती स्पर्धेत सर्वात उठून दिसली. तिच्या या यशाबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले. त्यांनी अद्विताला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. या यशाबद्दल शाळेत आनंदाचे वातावरण असून, अद्विताच्या पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.












