ठेकेदार संघटनेचे सुरेश चिपळूणकर यांचा संतप्त सवाल
ठेकेदार आर्थिक संकटात; बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज दिवसेंदिवस वाढतेय!
चिपळूण (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देखील ठेकेदारांच्या देयकांचा अद्यापही थांगपत्ता नाही. यामुळे आम्ही देणी कशी भागवायची? हा प्रश्न आहेच, शिवाय आम्ही गणेशोत्सव साजरा करायचा की नाही? असा संतप्त सवाल चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत असलेली कामे बँकांकडून कर्ज काढून उसनवारी करून पूर्ण केलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. मात्र, ही देयके गेल्या काही महिन्यांपासून मिळालेली नाहीत. यामुळे बँकांकडून काढलेली कर्ज थकीत असून दिवसेंदिवस व्याज देखील वाढत आहे. पर्यायाने भविष्यात कर्ज मिळणे अवघड होऊन बसले आहे. याचबरोबर देणेकऱ्यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला आहे. यामुळे ठेकेदार आर्थिक तणावाखाली येऊन आत्महत्या तर करणार नाहीत ना ! याची चिंता भेडसावत आहे. आता तर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही ठेकेदारांची देयके अदा करण्यासंदर्भात शासनाकडून अद्यापही कोणतीही पावले उचलली दिसत नाहीत. यामुळे आम्ही गणेशोत्सव साजरा करायचा की नाही ? असा आम्हाला प्रश्न पडला असून या देयकांसंदर्भात शासन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तरीही याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने ठेकेदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे, अशी माहिती सुरेश चिपळूणकर यांनी दिली.