जिल्हा प्रशासनाने नाकारलेल्या जागेची ६ कोटी ३६ लाख रुपयांना खरेदी होतेच कशी ?

कोत्रेवाडी नागरिकांचा मुख्याधिकारी तुषार बाबर यांना खडा सवाल, ठोस उत्तराभावी बैठक निष्फळ

लांजा (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाने नाकारलेल्या जागेचे खरेदीखत कसे केले जाते ? ठराव कसा केला जातो? हे बेकायदेशीर नाही का? आणि या जागेची ६ कोटी ३६ लाख रुपयांना प्रशासनाकडून खरेदी केली जाते याला जबाबदार कोण? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करत कोत्रेवाडी नागरिक मंगेश आंबेकर यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निरुत्तर केले. याबाबत समर्पक उत्तर न देता केवळ ठीक आहे मी बघतो असे उत्तर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी
दिल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थ १४ ऑगस्ट पासून छेडण्यात येणाऱ्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.

लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे वाडी वस्ती लगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नाही. जवळ जलस्त्रोत आहेत. असे असताना देखील प्रकल्प राबवला जात असल्याने कोत्रेवाडी नागरिकां च्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण छेडण्यात आले आहे .

या पार्श्वभूमीवर लांजा नगर पंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या समवेत ग्रामस्थांची बैठक आज गुरुवारी लांजा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी नागरिकांच्या वतीने भूमिका मांडताना मंगेश आंबेकर म्हणाले की, कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डंपिंग ग्राउंड प्रकल्प राबवला जात आहे. याविरोधात वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला आहे .आपल्याकडे निवेदन सादर केली आहेत.त्यामुळे हा कचरा प्रकल्प हटवणार कधी? असा सवाल त्यांनी केला. त्याचप्रमाणे मुळातच हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने केला आहे. कोत्रेवाडीतील ही नियोजित जागा जिल्हा प्रशासनाने अयोग्य ठरविलेली आहे. जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हा निवड समितीने ही जागा २०१६ च्या निकषात बसत नाही असे देखील पत्र दिले होते.
हे पत्र जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून आपण स्वतः लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना दिले होते. हे पत्र दिनांक १७/२/२०२१ रोजी आपण जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून लांजा नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना दिले होते ही बाब मंगेश आंबेकर यांनी मुख्याधिकारी बाबर यांच्या लक्षात आणून दिली.आणि त्यानंतर २०/३/२०२१ रोजी कोत्रेवाडीतील जागा नाकारल्याचे पत्र मुख्याधिकारी यांनी लांजा कोत्रेवाडी ग्रामस्थांना दिलेली आहे .

अशाप्रकारे जिल्हा निवड समितीने आणि आपण स्वतः जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून ही जागा नाकारलेली असताना देखील त्यानंतर जागेचे खरेदीखत केले, ठराव केला. हे बेकायदेशीर नाही का? निकारलेली जागा त्यानंतर योग्य कशी झाली? आणि ६ कोटी ३६ लाख रुपये कोणाचे गेले? शासनाचे आणि पर्यायाने आम्हा जनतेचे पैसे वाया गेले आहेत .त्याला जबाबदार कोण? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न मंगेश आंबेकर यांनी उपस्थित केले.
जिल्हा प्रशासन जागा अयोग्य ठरत असेल तर त्याची खरेदी कशी केली जाते? त्याला मंजुरी कशी दिली जाते? या गोष्टींची चौकशी करा. या संपूर्ण प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आमचे मत आहे. इतक्या साऱ्या गोष्टी होऊनही आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागतो.

दिनांक ८ जुलै रोजी आम्ही केलेल्या उपोषणाला प्रशासनाचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही? हे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार का? आम्हाला उपोषण करण्यासाठी प्रशासन भाग पाडते आहे. यात प्रशासन गप्प का? आम्हाला न्याय मिळणार का असे विविध प्रश्नांची सरबती मंगेश आंबेकर यांनी केली. दरम्यान प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस आणि समर्पक उत्तरे न मिळाल्याने कोत्रेवाडी नागरिक दिनांक १४ पासून उपोषण करण्यावर ठाम राहिले आहेत.