मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्ग ठप्प 

गगनबावडा तालुक्यात सात ठिकाणी पुराचे पाणी महामार्गावर 

करुळ चेक नाक्यावर वाहनांची मोठी रांग 

वैभववाडी l प्रतिनिधी :     मुसळधार पडणा-या पावसाचा सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गाला बसला आहे. गगनबावडा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. कुंभी नदीच्या पुराचे पाणी गगनबावडा तालुक्यातील मांडुकली, खोकुर्ले, शेणवडे, असळज, सांगशी, किरवे, लोंघे या ठिकाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी वाहने अडकून पडली आहेत. करूळ पोलीस तपासणी नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तसेच गगनबावडा या ठिकाणी वाहने थांबविण्यात आली आहेत.

कुंभी नदीच्या पुराचे पाणी मंगळवारी पहाटे महामार्गावर ठिकठिकाणी आले. या मार्गावर काही ठिकाणी वाहने थांबून आहेत. कुंभी धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून १३१० क्युसेक्स तर वीजनिर्मितीसाठी ३०० क्युसेक्स असा एकूण १६१० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कुंभी नदीपात्रात सुरू आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या विसर्गात पुन्हा १३०० क्युसेक्स पाण्याची वाढ केली जाणार आहे त्यामुळे अजून पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभी नदीवरील कातळी, सांगशी, पळसंबे, शेणवडे, मांडुकली व वेतवडे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठची ऊस व भात पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देणेत आला आहे.