कॅप्टन अरुण उतेकर यांचा सन्मान – ३० वर्षे सेवे नंतर १ सप्टेंबर रोजी होणार निवृत्ती

खेड : पंधरा गाव (कुरवळ-जावळी) येथील सुपुत्र कॅप्टन अरुण उतेकर यांचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर सन्मान करण्यात आला. त्यांनी तब्बल ३० वर्षे भारतीय लष्कराच्या सेना ऑर्डनन्स कोरमध्ये अत्यंत कर्तव्यदक्षतेने सेवा बजावली असून येत्या १ सप्टेंबर २०२५ रोजी ते सन्मानपूर्वक निवृत्त होत आहेत.

कॅप्टन उतेकर यांनी आपल्या सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत सैन्यदलाची कीर्ती वाढवली. देशसेवेसाठी त्यांनी दाखवलेल्या शौर्य, निष्ठा व प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यांच्या या गौरवशाली कार्याचा सन्मान करताना कॅप्टन आखाडे साहेब, अध्यक्ष आजी-माजी सैनिक संघटना खेड, तसेच माजी सैनिक निलेश मोरे (स्टेशन मास्टर), माजी सैनिक मंदार शिंदे यांच्यासह संपूर्ण आजी-माजी सैनिक संघटना खेड यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

गावकऱ्यांसह खेड तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी कॅप्टन उतेकर हे अभिमानाचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून, समाजात त्यांचे योगदान पुढेही मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.