रत्नागिरी : प्रतिनिधी
किरकोळ कारणातून तरुणाच्या हाताच्या पंजावर सुरीने वार केल्याची घटना सोमवार 15 जून रोजी सकाळी 10 वा.सुमारास साळवीस्टॉप येथील झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल विलास शिंदे (25,रा.साळवी स्टॉप झोपडपट्टी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अर्जुन रतन शिंदे (23,मुळ रा.डवरी वसाहत सायबर चौक दौलतनगर,कोल्हापूर सध्या रा.साळवी स्टॉप झोपडपट्टी,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी फिर्यादी हा त्याचा नातेवाईक अमोल जगताप याच्या झोपडीसमोर असलेला होता. त्यांच्या बाजुलाच एक कुत्रा होता. तेव्हढ्यात त्याच ठिकाणी राहणारा संशयित विशाल शिंदेने त्या कुत्र्याला लाथ मारुन हाकलून दिले असता तो कुत्रा त्याच्यावर भुंकला. म्हणून संशयिताने त्याला मारण्यासाठी दगड उचलला असता फिर्यादी अर्जुन शिंदेने अरे त्या मुक्या प्राण्याला कशाला मारतोस, त्याने तुझे काय केले असे बोलला. याचा राग आल्याने संशयित विशाल शिंदेने फिर्यादीला शिवीगाळ करत घरातील सूरीने त्याच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करत दुखापत केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.











