चिपळूण: बेफिकीर थार चालकामुळे त्याच्यासह चार निष्पापांचा बळी

थारमधील युवती ठरली सुदैवी

रत्नागिरी –

चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात बेफिकीर थार चालकासह तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे थार गाडीत प्रवास करणारी युवती अपघातापूर्वीच खाली उतरवली गेल्याने ती सुदैवाने बचावली.

अपघाताची पार्श्वभूमी

हरियाणा पासिंग असलेल्या थार गाडीतून डेहराडून येथील आसिफ सैफी (वय 25) हा चालक आपल्या युवती मैत्रिणीसोबत गोव्याहून परतत होता. दरम्यान, त्याला बहिणीचा फोन आला आणि त्यांच्यात वाद झाला. त्याच रागात आसिफने गाडीतच दारू प्यायली. सोबतची युवती घाबरल्याने “मी गाडी चालवते, तू बाजूला बस” असे सांगितले. मात्र आसिफने नकार देत गाडी सुसाट वेगाने चालवली.

युवतीला जीवाची भीती वाटल्याने तिने गाडीची काच खाली करून “Save me, save me” असा आरडाओरडा केला. त्यानंतर आसिफने तिला रस्त्यातच खाली सोडले आणि एकटाच पुढे निघून गेला. काही वेळातच त्याने रिक्षेला समोरून धडक दिली आणि या भीषण अपघाताला कारणीभूत ठरला.

निष्पापांचा बळी

या अपघातात ठार झालेल्यांमध्ये –शबाना मियां सय्यद, नियाज हुसेन सय्यद, ३ वर्षांचा हैदर नियाज सय्यद, रिक्षा चालक ब्राहिम इस्माईल लोणी (वय 60), आणि थार चालक आसिफ सैफी (वय 25, डेहराडून) यांचा समावेश आहे.

यामध्ये सय्यद कुटुंबातील आई-वडील व त्यांचा लहान मुलगा असे तिघे समाविष्ट असून ते पुण्यातून परतत होते. रिक्षा चालक स्थानिक असल्याने एकाच गावातील चार जीव या अपघातात गेले.

रिक्षा व थार समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना जोरदार धडकले. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. घटनास्थळी आई-वडील व मुलगा, रिक्षा चालक आणि थार चालक – अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बेले, पोलीस निरीक्षक श्री. मेंगडे आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मदतकार्य केले. अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

थारमधील युवती ठरली सुदैवी

या संपूर्ण घटनेत आसिफसोबत असलेली युवती मात्र सुदैवाने वाचली. अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच आसिफने तिला रस्त्यावर सोडले होते. अन्यथा या अपघातात तिचाही जीव गेला असता. त्यामुळे बेफिकीर चालकाच्या हठ्ठागिरीचा फटका निष्पाप चौघांना बसला, तर सोबतची युवती मात्र दैवबलवत्तर ठरली.