खेड (राकेश कोळी) : “माझं रेल्वेचं इंजिन थांबलं…” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कोकणातील ज्येष्ठ मनसे नेते व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपली वेदना व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत बोलताना खेडेकर भावुक झाले. त्यांनी सांगितले, “आज सोशल मीडियावर पत्र पाहून धक्का बसला. हे पत्र माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. तीस वर्षे पक्ष कुटुंबाशी जोडलेलो होतो, पण आजच्या पत्रामुळे त्या नात्याला ब्रेक बसला.”
यावेळी खेडेकर पुढे म्हणाले, “मनसेसाठी कोकणात मी बीजे रुजवली. खेड नगर परिषद पंधरा वर्षे मनसेच्या ताब्यात राहिली. मी पहिल्यांदाच थेट नगराध्यक्ष झालो. कोविडच्या काळात, पक्ष संकटात असताना मी नेहमी लोकांसोबत राहिलो. पण आज माझ्या निष्ठेला संशयाने पाहिलं गेलं. भाजपच्या काही नेत्यांना भेटलो म्हणून पक्षांतर करतोय असा गैरसमज निर्माण केला गेला.” आपण कोणत्याही पक्षप्रवेशाचा विचार केलेला नव्हता, हे ठामपणे सांगत खेडेकर म्हणाले, “कार्यकर्त्याला तडीपारीपासून वाचवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो. विकासासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणं भाग असतं. पण त्यातून माझ्यावर संशय घेतला गेला. साहेबांना भेटायचा मी खूप प्रयत्न केला, पण अद्याप भेट मिळाली नाही. जर हे पत्र राज ठाकरेंनी स्वतः दिलं असतं, तर आदेश म्हणून मी स्वीकारलं असतं. पण गैरसमजावर आधारित कारवाई झाली हे दुर्दैव आहे.” भावुक होत खेडेकर म्हणाले, “माझं इंजिन थांबलेलं असलं तरी हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन. मला अजिबात घाई नाही. योग्य वेळेची वाट पाहूनच पुढील निर्णय घेईन. लवकरच कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवू. ”मनसेतील संवादाच्या अभावावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “राज ठाकरेंचा आमच्याकडे थेट फोन नंबर नाही. केवळ मेसेज करता येतो असा नंबर दिला आहे. संवाद झाला असता तर ही वेळ आली नसती,” असे ते म्हणाले. मनसेतून बडतर्फ झाल्याचे कळल्यावर सर्वप्रथम मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंचा फोन आला आणि अनेकांनी धीर दिल्याचेही खेडेकरांनी सांगितले.











