वैजी येथील मंगेश भडवळकर यांची कलाकृती म्हणजे भक्ती रसाचा गोडवा
संतोष कुळे चिपळूण :
गणेशोत्सव आणि विविध देखावे हे समीकरण आता सर्रास सगळीकडे पाहावयास मिळते. मात्र काही देखावे असे असतात की ते खास आकर्षण ठरतात. असेच देखावे गेली अनेक वर्षे वैजी भडवळकर वाडी येथील मंगेश वामन भडवळकर आणि कुटुंबाने गणेश उत्सवात साकारले आहेत. यावर्षी ही मंगेश भडवळकर यांनी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा देखावा साकारत स्वामींचा महिमा आणि भक्ती रसाचा संदेश देखाव्यातून दिला आहे. देखावे साकारताना कुटुंबाचे सहकार्य मंगेश भडवळकर यांना नेहमीच लाभते.
गेल्या अनेक वर्ष या तरुणाने आपली नोकरी सांभाळत गणेश उत्सवातील विविध देखावे साकारण्याची आवड जोपासली आहे. खरतर सर्व भडवळकर कुटुंब कलाप्रेमी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वडिलांना सुद्धा भजनाचा खूप छंद आहे. मंगेश भडवळकर यांनी आतापर्यंत जनजागृती पर संदेश देणारे अनेक देखावे साकारले आहेत. गणेश उत्सवातून समाजप्रबोधन व्हावे हा त्यांचा एक हेतू असतो. या देखाव्यांमध्ये मुलगी वाचवा, कालिया मर्दन, वृक्ष लागवड, जि.प. शाळा वाचल्या पाहिजेत अशा विविध प्रकारचे देखाये त्यांनी गेल्या काही वर्षात साकारले आहेत. हे देखावे पाहून अनेक गणेशभक्तांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
यावर्षी सुद्धा मंगेश यांनी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा देखावा साकारत स्वामींचा महिमा आणि भक्तीरसाचा गोडवा या देखाव्यातून साकारला आहे.
हा देखावा पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक गणेशभक्तांनी वैजी येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेत देखावा पहिला आहे. रसिका भडवळकर, मंगेश भडवलकर आणि त्यांचे चुलत बंधू यांनी हा देखावा तपार करण्यासाठी अथक प्रयत्न घेतले आहेत. गेले दहा दिवस हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मंगेश हे स्वतः वायरमन या पदावरती कार्यरत असून त्यांना सामाजिक आणि संस्कृतिक कलेची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांचे वडील वामन घडवळकर हे सुद्धा एक उत्कृष्ट भजनी बुवा आहेत. हे संपूर्ण कुटुंब सांस्कृतिक कला आणि सामाजिक सेवेत अग्रेसर असते. आतापर्यंत गणेश उत्सव सजावट स्पर्धेतील अनेक पारितोषिके मंगेश आणि कुटुंबाने जिंकलेली आहेत.











