समतोल बिघडल्यास पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात: डॉ. व्ही. एन. शिंदे

स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प सादर 

सावंतवाडी । प्रतिनिधी : जंगल ही केवळ झाडांची गर्दी नसून ती पृथ्वीची जीवनरेषा आहे. या जीवनरेषेवर होणारा कोणताही आघात अखेर मानवजातीच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण करणारा ठरेल. जंगल प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, ही केवळ विकासाची किंमत नसून विनाशाची पूर्वसूचना आहे,” असा गंभीर इशारा प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी येथे दिला.

श्रीराम वाचन मंदिर आणि सावंतवाडी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प डॉ. शिंदे यांनी गुंफले. “जंगल प्रदूषण मानवाला संपवेल” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना वाढती वृक्षतोड, रस्ते बांधकाम, फार्महाऊस संस्कृती आणि ‘सेकंड होम’ प्रकल्पांमुळे होणाऱ्या हानीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

कोकणातील निसर्गचक्र धोक्यात

डॉ. शिंदे म्हणाले की, कोकण हा जैवविविधतेने समृद्ध प्रदेश आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली होणारे अतिक्रमण आणि पारंपारिक शेती सोडून केवळ काजू-आंबा लागवडीवर (मोनो कल्चर) दिलेला भर यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. एकाच प्रकारची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने मातीतील नैसर्गिक घटक नष्ट होतात आणि इतर वनस्पती व प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदूषणाची व्यापक व्याख्या

जंगल प्रदूषण म्हणजे केवळ प्लास्टिक किंवा कचरा टाकणे नव्हे, तर माती, पाणी आणि हवेचे प्रदूषणही जंगलावर तितकाच परिणाम करते. औद्योगिक धूर, रासायनिक द्रव्ये आणि वाढता आवाज प्रदूषण यामुळे वन्यजीवांचे जीवन विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मानवी हस्तक्षेपामुळे अन्नसाखळी विस्कळीत होत असून त्याचा थेट फटका मानवालाच बसत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

वन्यजीव संघर्ष आणि हवामान बदल

जंगलांचे क्षेत्र घटल्यामुळे वन्यजीवांचा मानवी वसाहतींमधील वावर वाढला आहे. हा मानव-वन्यजीव संघर्ष दोन्ही बाजूंच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. तसेच, जंगलांच्या ऱ्हासामुळे अनियमित पाऊस, वाढते तापमान, दुष्काळ आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढत असल्याचे डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

संवर्धनासाठी साद

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. “निसर्ग आपल्याला सर्व काही देतो, मात्र त्याचा गैरवापर केल्यास तोच निसर्ग आपल्याला शिक्षा करतो,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. या व्याख्यानाला सावंतवाडीतील नागरिक आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.