तुरंबवच्या प्रसिद्ध शारदादेवी नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून होणार प्रारंभ

 संततीप्राप्तीसाठी नवसाला पावणारी शारदादेवी

चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चिपळूण तालुक्यातील तुरंबव हे श्री शारदादेवीचे तीर्थक्षेत्र यंदा नवरात्रात पुन्हा भक्तांनी गजबजणार आहे. २२ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होत असून संततीप्राप्तीसाठी नवसाला पावणारी ही ग्रामदैवत शारदाई म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धा आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून १२ किलोमीटर अंतरावर आणि निवळीपासून सुमारे ४ किमीवरील निसर्गरम्य तुरंबव देवस्थान दाट हिरवाईने वेढलेले आहे. नवरात्रातील पहिल्या माळेनंतर येथे शारदोत्सवाची सुरुवात होते. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. २२ सप्टेंबर रोजी रुप्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, सायंकाळी ६ ते रात्रौ ११ पर्यंत दर्शन, रात्री ९ वाजता महाआरती, १०.३० ते ११.३० पारंपरिक जाखडी नृत्य, त्यानंतर संतती नवसाची सुरुवात. दि. २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी ८ ते रात्रौ ११ देवीचं दर्शन, रात्री ९ वाजता महाआरती, १०.३० वाजता जाखडी नृत्य आणि ११.३० पासून संतती नवस करणे व फेडणे. संततीसाठी नवस करणारे भाविक ट्रस्टकडून उपलब्ध ओटी साहित्य घेऊन पहाटे ५ वाजेपर्यंत नवस पार पाडतात. रात्री ११.३० नंतर गाभाऱ्यात प्रवेश बंद असला तरी मुखदर्शनाची सोय ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने चिपळूण-तुरंबव आणि सावर्डे-तुरंबव या मार्गांवर विशेष बसफेऱ्या ठेवल्या आहेत. कोकण रेल्वेने येणाऱ्यांनी सावर्डे स्थानकावर उतरावे, गाडीचा थांबा नसेल तर चिपळूण येथे उतरून रस्त्याने यावे. यात्रेदरम्यान परिसरात खाद्यपदार्थांची स्टॉल्स, राहण्याची सोय आणि विविध करमणूक सुविधा उपलब्ध राहतील. भाविकांना उत्तम दर्शन व्हावे व कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट व ग्रामस्थांनी नियोजन केले असून अधिक माहितीसाठी ७७२००७५१९२ /७७९६४७५१९२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.