जिल्ह्यातील युवकांना संधी!!!
के. के. घाटवळ यांचे लाभ घेण्याचे आवाहन
दोडामार्ग:सुहास देसाई :भारत सरकारच्या केंद्रीय युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ (VBYLD) २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण पिढीला नेतृत्व, चर्चा आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा आहे.
‘विकसित भारता’च्या दृष्टिकोनाशी तरुणांना जोडण्यासाठी हा संवाद एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. तरुणांना त्यांचे विचार, ऊर्जा आणि नेतृत्व कौशल्ये दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
पहिला टप्पा: ‘माय भारत क्विझ’
या संवादाची सुरुवात ‘माय भारत क्विझ’ ने होत आहे. ही स्पर्धा एकूण १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात २० प्रश्न असून, त्यासाठी १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पहिल्या टप्प्यात सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर, २०२५ आहे.
या क्विझमधील पहिल्या १०,००० विजेत्यांना ‘माय भारत’ची विशेष भेटवस्तू दिली जाईल.
पुढील टप्पे आणि अंतिम फेरी
निवड झालेल्या स्पर्धकांना निबंध लेखन, सादरीकरण आणि संवाद सत्रासारख्या पुढील टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. अंतिम फेरीचा कार्यक्रम १० ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे.
सहभागासाठी आवाहन
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://mybharat.gov.in/quiz/quiz_dashboard/UzZIZmhEeWt6bmtzcGg1ZHQ1dWc3QT09 या लिंकवर नोंदणी करू शकता. मेरा युवा भारत, सिंधुदुर्गचे उपसंचालक श्री. कालिदास घाटवळ यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि तरुणांनी यात सहभागी होऊन विकसित भारताच्या उभारणीत आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
हा संवाद तरुणांना त्यांचे विचार मांडण्याची, नेतृत्व कौशल्ये प्रदर्शित करण्याची आणि सामाजिक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याची अनोखी संधी मिळणार आहे











