खेडमध्ये ‘विज्ञानामृतम् २०२५-२६’ जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

खेड, प्रतिनिधी :
खेड येथील एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘विज्ञानामृतम् २०२५-२६’ हे भव्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन डिस्ट्रिक्ट सायन्स बोर्ड आणि सोसायटी जनरल सिक्युरिटी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन खेडचे गट विस्तार अधिकारी संतोष भोसले आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांची पाहणी करत त्यांच्या कल्पकतेचे आणि संशोधनात्मक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.
२६ फेब्रुवारी रोजी आयोजित या प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रयोग, कार्यरत मॉडेल्स आणि वैज्ञानिक संकल्पनांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विज्ञान या विषयांवर आधारित प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रयोगांमधून समस्यांवर शास्त्रीय उपाय सुचवत आत्मविश्वासाने मांडणी केली.
या संपूर्ण प्रदर्शनाचे नियोजन सार्थक सपकाळ आणि शुभम जंगम यांनी यशस्वीपणे पार पाडले. प्रदर्शनाला पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. उपस्थितांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या सृजनशीलतेला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
‘विज्ञानामृतम् २०२५-२६’ या विज्ञान प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातील संशोधक आणि वैज्ञानिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.