खेड – (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने तसेच जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने क्रीडा संकुल, डेरवण येथे जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विशेष यश संपादन केले. शालेय गटातील सायकलिंग प्रकारात कु. पियुष पवार याने प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. सुमेध आंबेकर याने तृतीय क्रमांक पटकावत आपले आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड आता कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धेसाठी झाली असून, या कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. कृणाल चव्हाण आणि सौ. शितल घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे शालेय वर्तुळात गौरवण्यात आले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.











