खेडच्या युवा नेतृत्वाला राज्यस्तरीय संधी; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नवी घोषणा करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला या निवडीत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. खेडचे सुपुत्र तथा युवा नेतृत्व म्हणून कार्यरत असलेले ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची पक्षाने घेतलेली दखल म्हणून या निवडीकडे पाहिले जात असून, या माध्यमातून खेड तालुक्याला भाजपच्या राज्यस्तरीय संघटनेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी मा. सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने युवा मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ॲड. मिलिंद नांदगांवकर यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खेड तालुक्यात पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी युवकांशी सातत्याने संपर्क ठेवत संघटन वाढीसाठी काम केले आहे. युवा वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल या निवडीच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक अनुभवाच्या जोरावर आता त्यांना थेट महाराष्ट्र प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
ॲड. मिलिंद नांदगांवकर यांच्या निवडीची माहिती खेडमध्ये पोहोचताच भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीच्या माध्यमातून खेड तालुक्याचे नाव राज्याच्या राजकीय व संघटनात्मक पटलावर अधिक ठळकपणे पुढे येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निमित्ताने आयोजित अभिनंदन कार्यक्रमाला भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजप अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजप खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजप खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजप प्रेरित रिक्षा सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजप प्रेरित रिक्षा सेलचे खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजप रिक्षा युनिटचे उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, भाजप खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, रविंद्र उर्फ बाबुशेठ नांदगांवकर, भाजप खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजप खेड शहराचे विजय गुप्ता, भाजप युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजप खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजप युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजप युवा मोर्चा खेड शहर कार्यकारिणी सदस्य रत्नदीप जाडकर, अहमद हमदुले, प्रदीप भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच राज्यातील युवकांना भाजपच्या संघटनेशी जोडणे, युवा कार्यकर्त्यांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, यावर ॲड. नांदगांवकर यांचा भर राहणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाचा आणि संघटनात्मक अनुभवाचा फायदा युवा मोर्चाला राज्यभर होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
खेडच्या स्थानिक राजकारणातून संघटनात्मक वाटचाल करत राज्यस्तरीय जबाबदारीपर्यंत पोहोचलेल्या ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांच्या निवडीमुळे खेड तालुक्यातील युवा नेतृत्वाला नवे बळ मिळाले असून, आगामी काळात भाजप युवा मोर्चाच्या संघटन विस्तारात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.














