इंद्रधनू देवगड आयोजित व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून देवगड शहरातील तारी कंपाऊंड येथे २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवांतर्गत फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सेलिब्रेटी ऑर्केस्ट्रा विथ दांडिया अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात पावसाचा येणारा व्यत्यय टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी यावर्षी प्रथमच ‘जर्मन हँगर’ बसविण्यात येत असून जिल्ह्यात प्रथमच असा प्रयोग करण्यात येत आहे. त्यामुळे पावसातही नवरात्र उत्सवातील सर्व कार्यक्रम सुरळीत सुरू राहतील, अशी माहिती इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कुळकर्णी यांनी ‘नवरात्र उत्सव २०२५’ च्या कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोसकर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, इंद्रधनू संस्थेचे उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, सहसचिव उदय रुमडे, खजिनदार तुषार पाळेकर, सदस्य मिलिंद मोर्ये, राजीव पडवळ, आनंद रामाणे, वैभव केळकर, दिनेश पटेल, प्रशांत पटेल, भावेश पटेल, यतीन कुळकर्णी, नरेश डामरी आदी उपस्थित होते. श्री. कुळकर्णी म्हणाले, पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून इंद्रधनू देवगड या संस्थेने यावर्षीचा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी यावर्षी प्रथमच कार्यक्रमस्थळी ‘जर्मन हँगर’ बसविण्यात येत आहे. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत रात्री ९.३० पासून नवरात्र उत्सव रंगणार असून दांडिया नृत्यात सहभागी होणाऱ्यांमधून लक्षवेधी चेहरे (स्त्री / पुरुष), दांडिया नाईट ऑफ किंग, दांडिया नाईट ऑफ क्चीन, बेस्ट स्माईल, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट चाईल्ड (गर्ल / बॉय) अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच सोशल मीडिया वोटींगद्वारेही ‘इंद्रधनू इंस्टा किंग’ व इंद्रधनू इंस्टा क्वीन’ यांची निवड करून गौरविण्यात येणार आहे.
*२ ऑक्टोबर रोजी रंगणार फॅन्सी ड्रेस स्पर्धा*
२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. लहान गटात 5 ते 15 वर्षे वयोगटातील स्पर्धक, तर मोठ्या गटात 15 वर्षापुढील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. लहान गटातील प्रथम क्रमांकास ५ हजार रू./ सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ३ हजार रू. / सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास २ हजार रू./ सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकास १ हजार रू. असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर मोठ्या गटातील प्रथम क्रमांकास ८ हजार रू. / सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ५ हजार रू./सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास ३ हजार रू./ सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकास १ हजार रू. असे बक्षीस देण्यात येणार आहे. लहान गटात ३० स्पर्धकांना, तर मोठ्या गटात २० स्पर्धकांना सहभाग दिला जाणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी यतीन कुळकर्णी (मोबा. ९४२३३०३७८९), उदय रुमडे (९४२२५९६२९६) यांच्याशी संपर्क साधावा.
*३ ऑक्टोबर रोजी सेलिब्रेटी नाईट विथ दांडिया*
३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा. `सूर नवा ध्यास नवा उपविजेती व सुप्रसिद्ध गायिका संज्योती जगदाळे यांचा सेलिब्रेटी नाईट विथ दांडिया हा कार्यक्रम रंगणार आहे. या नवरात्र उत्सवातील दहा दिवसांत निवडलेल्या सर्व विजेत्यांना यात सहभाग देण्यात येणार असून यातून संस्थेचा ‘स्टार ऑफ इंद्रधनू दांडिया २०२५’ (स्त्री/पुरुष) हा मानाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर ‘सेलिब्रेटी चॉईस’ ने ‘नवरात्री डान्स आयकॉन २०२५’ (स्त्री/ पुरुष) असे दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. या नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री. कुळकर्णी यांनी केले आहे.













