धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानात योग दिन उत्साहात साजरा
बांदा : प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण युगात योग ही मानवाला लाभलेली मोठी देणगी आहे. केवळ एका दिवसापुरता योग न करता तो आपल्या जीवनशैलीचा भाग बनवला पाहिजे. नियमितपणे योगा करा आणि निरोगी रहा हाच आजच्या दिवसाचा खरा संदेश आहे. नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी धारगळ येथे केले.
धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या ठिकाणी योग दिन अत्यंत उत्साही आणि चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला संस्थेतील शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, नामांकित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी सामूहिक रित्या विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान साधनेचा सराव केला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.













