बुधवारी सकाळी ओणी येथे होणार अंत्यसंस्कार
राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यातील नूतन विद्या मंदिर ओणीचे माजी प्राचार्य गुरुवर्य शहाजीराव भाऊराव खानविलकर 85 यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. एड. गुरुदत्त खानविलकर यांचे ते वडील होत.
मूळचे लांजा तालुक्यातील गोळवशी गावचे रहिवासी असलेले शहाजीराव खानविलकर हे ओणी येथे स्थायिक झाले होते. ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्या मंदिर ओणी व कनिष्ठ महाविद्यालयातून ते सेवानिवृत्त झाले होते. ओणी प्रशाळेच्या. निर्मितीत व जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक शिस्तप्रिय, विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता व विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या शैक्षणिक काळातील कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते. मानाच्या गुरुवर्य पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधत उच्च पदांवर मजल मारली आहे.
राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते. संघाचे खजिनदार म्हणून ते कार्यरत होते. राजापूर च्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असे. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारी सुरू होते. उपचारांती मंगळवारी दुपारी त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली व सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
खानविलकर यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10 वाजता ओणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून नातवंडे, भाऊ , पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने एक समर्पित शिक्षक व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.











