रत्नागिरी :
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या संयुक्त अहवालानुसार, २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः २५, २६ व २७ सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी २६ व २७ सप्टेंबर रोजी सर्व शेतीची कामे टाळावीत. शेतातील कामे शक्यतो २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान अनुकूल हवामान असेल तेव्हाच करावीत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:
-
भात, नागली, वरी, भाजीपाला, आंबा, काजू, सुपारी, नारळ व हळद या पिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
-
रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी.
-
भातशेतीत बांधांवरील गवत काढून टाकावे, जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव कमी होईल.
-
भात, भाजीपाला व इतर पिकांवर करपा, किडी, अळी, फळमाशी आदी रोग व किडींवर नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे बुरशीनाशक/कीटकनाशक फवारणी करावी.
-
विजेच्या गडगडाटाचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे “दामिनी” ॲप वापरावे.
-
जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. लंपी स्किन डिसीज आढळल्यास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावेत व रोगी जनावरांना वेगळे ठेवावे.
नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.













