कर्मचाऱ्यांच्या विश्वासातून ‘स्कॉन’ची मोठी भरारी

 ‘काम करण्यासाठी उत्तम संस्था’ म्हणून गौरव

 ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीसाठी प्रमाणपत्र प्रदान

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणपुत्र, उद्योजक निलेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ने आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. कर्मचाऱ्यांसाठी उत्तम कामाचे वातावरण, व्यावसायिक विकासाच्या संधी आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण केल्याबद्दल कंपनीला ‘Great Place To Work® Certified’ प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीसाठी हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
‘Great Place To Work®’ ही अमेरिकास्थित जागतिक संस्था असून, तिचे मुख्यालय ऑकलंड, कॅलिफोर्निया येथे आहे. कार्यस्थळावरील संस्कृती आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचे मूल्यांकन करण्यासाठी ही संस्था जगभरात ओळखली जाते. भारतात ‘Great Place To Work® India’मार्फत कर्मचाऱ्यांचा अभिप्राय आणि संस्थेतील विश्वासाचे वातावरण यांचे सर्वेक्षण केले जाते. या मूल्यांकनाच्या आधारे कंपन्यांना प्रमाणपत्र दिले जाते. व्यावसायिक विस्तारासोबतच कर्मचाऱ्यांचे समाधान, त्यांचा सर्वांगीण विकास आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण यांना ‘स्कॉन’ने विशेष महत्त्व दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांची या प्रमाणपत्रातून दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान कंपनीच्या व्यवस्थापनासह संपूर्ण कर्मचारीवर्गासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि संस्थेवरील त्यांचा विश्वास हीच कंपनीची खरी ताकद असते. कौशल्यविकासाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याच्या ‘स्कॉन’च्या दृष्टिकोनाला या गौरवाने अधोरेखित केले आहे. या प्रमाणपत्रामुळे ‘स्कॉन प्रोजेक्ट्स’च्या कार्यसंस्कृतीला व्यापक ओळख मिळाली असून, कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. उद्योजक निलेश चव्हाण आणि ‘स्कॉन’चे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.